कोपरीतील बहुसंख्य इमारती आणि चाळीतील रहिवाशांना पुनर्विकासाचे लागले वेध

कोपरीतील बहुसंख्य इमारती आणि चाळीतील रहिवाशांना पुनर्विकासाचे वेध लागले असून, संभाव्य इमारतीतील नियोजित घराबाबत पुनर्विकास तज्ज्ञ आणि नागरिक यांच्यात विचारमंथन पार पडले. कोपरी परिसरात महापालिकेकडून क्लस्टर अंतर्गत विकास करण्यासाठी कोपरी विकास प्रस्ताव – २०२३ जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक जुन्या इमारती आणि सिंधी कॉलनीतील इमारतींचा विकास दृष्टीपथात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सविस्तर माहिती देण्यासाठी `चव्हाण ग्रुप फाउंडेशन’च्या वतीने `नॉलेज सेमिनार-२०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ३५० हून अधिक सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, वास्तूविशारद मुकुंद गोडबोले, स्ट्रक्चरल ऑडिटर निखिल शेठ यांनी पुनर्विकास नियमावलीतील तरतूदी आणि सोसायटी तसेच सभासदांची जबाबदारी, इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीटची गरज आणि कोपरी विकास प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती दिली.मुंबईच्या प्रवेशद्वारावर वसलेल्या कोपरीला भौगोलिक महत्व आहे. त्याचबरोबर शांततामय वातावरणामुळे नागरिकांची कोपरीत वास्तव्याला पसंती आहे. सिंधी कॉलनीसह अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींचा विकासाची चर्चा सुरू आहे. काही इमारती विकसित झाल्या आहेत. संभाव्य क्लस्टर आणि पुनर्विकासाच्या नियमानुसार आपल्या सोसायटीचा विकास कसा करायचा, याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या सेमिनारला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. सध्या कोपरीत घर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला भविष्यात सध्याच्या जागेपेक्षा मोठी जागा मिळेल. प्रत्येक कुटुंबाला हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपा सतर्क असेल, अशी ग्वाही भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिली. एकाही नागरिकावर अन्याय होणार नाही, यासाठी दक्ष आहोत, अशी ग्वाही माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading