कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीस सादर

कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, भांडवली खर्चात स्वीकरलेल्या दायित्वातील कामे पूर्ण करण्यावर भर देणारा, वास्तववादी अर्थसंकल्प तसेच कोरोना काळातही उत्पन्न वाढीसाठी साहाय्यभूत ठरणारा ठाणे महापालिकेचा 2021- 2022 चा सुधारित 3510 कोटी रूपयांचा तर 2022-2023चा 3299 कोटी रूपयांचा मुळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज स्थायी समितीस सादर केला. गेल्यावर्षी अर्थसंकल्पमध्ये कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी तसेच नागरिकांवर अनेक बंधने आणावी लागली त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्न स्तोत्रांवर झाला होता. अशा परिस्थितीत विविध उत्पन्न स्तोत्रापासून अपेक्षित उत्पन्नाचे आणि त्याप्रमाणात खर्चाचे अधिकाअधिक वास्तविकतेच्या जवळ जाणारे अंदाज गृहीत धरुन चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी इत्यादीचा परिणाम महापालिकेच्या प्रत्यक्ष उत्पन्नावर झालेला आहे. नागरिकांचे जीव वाचविणे आणि कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रित ठेवणे हा प्रमुख केंद्रबिंदु ठेवून कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक औषधे, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सोयीसुविधा पुरविणे, जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांचे लसीकरण आणि त्याचवेळी शहरातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण व्यवस्था, स्वच्छता जनजागृती मार्गाचा अवलंब करावा लागल्याने महापालिका निधीतून मोठया प्रमाणावर खर्च करावा लागलेला आहे, अशा संकटकालीन परिस्थितीतही महापालिकेचे पदाधिकारी, सदस्य आणि प्रशासन यांच्या सांघिक प्रयत्नातून खर्चात काटकसर, हाती घ्यावयाच्या कामाची आवश्यकता विचारात घेऊन कामाचा प्राध्यान्यक्रम निश्चित करुन कामे हाती घेणे इत्यादी बाबतीतील सुयोग्य नियोजनामुळेच शहराची यशस्वी वाटचाल सुरु आहे. कोरोना काळात सर्वांनाच संकटांचा प्रचंड सामना करावा लागला. महापालिका या संकटातून वाट काढत ठाणेकरांना जास्तीत जास्त मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे महापालिकेसही अपेक्षित असलेले कर, दर आणि शुल्कापोटी काही बाबींचा अपवाद वगळता उर्वरित बाबींपासून अपेक्षित महसुल प्राप्त झाला नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. हा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष प्राप्त होणा-या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करुनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक 2755 कोटी 32 लक्ष रकमेचे तयार करण्यात आले होते. यामध्ये काही विभागांकडून अपेक्षित केलेले उत्पन्न साध्य होत नसले तरी शहर विकास विभागाकडून अपेक्षित उत्पन्नापेक्षा मोठया प्रमाणात वाढ झाल्याने तसेच शासनाकडून क्लस्टर योजना, पंधरावा वित्त आयोग, पायाभूत सुविधा अंतर्गत अनुदान तसेच माझी वसुंधरा अंतर्गत बक्षिस रक्कम इत्यादीचा विचार करता सुधारित अंदाजपत्रक 3510 कोटी रकमेचे तयार केले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 3299 कोटी रकमेचे मूळ अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading