कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचं विविध मागण्यांसाठी १८ जूनला होणारं आंदोलन स्थगित

आपल्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानं १८ जूनला पुकारलेलं बंदचं आंदोलन स्थगित केलं आहे. शासन आणि प्रशासकीय पातळीवर मागण्यांबाबत ठोस आश्वासन मिळाल्यानं हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. भाडे दरवाढ या मुख्य मागणीबरोबरच मुक्त केलेले रिक्षा टॅक्सी परवाने तात्काळ बंद करावेत, रिक्षा टॅक्सी चालक मालकांकरिता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, सीएनजी गॅस सिलेंडर चाचणीसाठी वाढवलेले दर कमी करावेत, थर्ड पार्टी विम्याची वाढवलेली रक्कम कमी करावी, बेकायदेशीर वाहतूक करणा-या वाहनांना प्रतिबंध करावा, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याकरिता होणारा विलंब टाळावा अशा महासंघाच्या मागण्या होत्या. यासाठी १८ जूनला बंदची हाक देण्यात आली होती. पालकमंत्र्यांना ही माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी मंगळवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि महासंघाच्या पदाधिका-यांसमवेत चर्चा घडवून आणली. महासंघाच्या मागण्यांबाबत समिती नेमून ठोस निर्णय घेण्याचे परिवहन मंत्र्यांनी मान्य केलं. त्याचप्रमाणे काल परिवहन आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत प्रलंबित समस्या सोडवण्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि बंद करू नये अशी विनंती करण्यात आली. त्यामुळं शासन आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं प्रकाश पेणकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading