केमिकल मिश्रीत पाण्यामुळे डोंबिवलीकर हैराण

कधी गुलाबी रस्ता तर कधी हिरवा पाऊस हे कमी म्हणून की काय नाल्यातून वाहणारे निळे, दुधाळ केमिकलमिश्रित सांडपाणी यामुळे डोंबिवलीकर नागरिक हैराण झाले असताना आता डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा कंपन्यातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेम्बरमधून लाल रंगाचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी नेहमीच चेम्बरमधून ओव्हरफ्लो होत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत असतात. गेल्या दोन दिवसापासून कल्याण डोंबिवली परिसरात कोसळत असलेल्या पावसामुळे डोंबिवली एमआयडीसी कंपन्यातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेम्बरमधून लाल रंगाचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एमआयडीसीकडून कंपन्यातील सांडपाणी बंदिस्त नाल्याद्वारे प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेत या पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर ते सांडपाणी पुन्हा बंदिस्त नाल्याद्वारे खोल खाडीत सोडण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र कंपन्यापासून सांडपाणी प्रकल्पापर्यंत हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात ठिकठिकाणी डेब्रिजच्या गोणी, प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली बारदाने, प्लास्टिकचा कचरा टाकला जात असल्याने हे नाले तुंबतात. या नाल्याची सफाई करण्याचे काम एमआयडीसीचे आहे. मात्र यंदा एमआयडीसीकडून ही नालेसफाई झाल्याचे दिसत नाही. यामुळेच टाटा पॉवरकडून खंबाळपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या नाल्यातील सांडपाणी चेम्बर्समधून रस्त्यावरून वाहत आहे. लाल रंगाच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे एमआयडीसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वी डोंबिवलीत झालेला हिरवा पाऊस, गुलाबी रस्ता, हिरवा नाला यामुळे डोंबिवली शहराला प्रदुषणाचा विळखा असल्याचे उघड झाले आहे. आता हे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने शहराची प्रदुषणातून मुक्तता करण्यासाठी संबधित यंत्रणांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading