कृषि मंत्र्यांनी घेतला कोकण विभागीय खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा

कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
कोकण विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजना पोचविण्यासाठी आणि मदत देण्यासाठी कृषि विभागाने पाऊले उचलावीत. विभागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करावे. खते, बि-बियाणांशिवाय शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाने प्रयत्न करावेत. कोकणातील जमिनीची उपलब्धता पाहून शेतीसाठीच्या पाणी साठविण्यासाठी जलकुंभासारखे नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासंदर्भात विचार व्हावा.
खरीप हंगामात खतांचा आणि बि-बियाणांचा पुरेसा पुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे. खतांचा गैरवापर रोखण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कोकण विभागात आंबा, काजू, भात या पिकांसह इतर पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पहिलीपासुन कृषि शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सत्तार यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही सत्तार यांनी यावेळी सांगितले. यावेळी पाचही जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामाचे नियोजनाची माहिती तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यावेळी राज्यस्तरीय नाचणी पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने तयार केलेल्या भित्तीचित्रांचे प्रकाशन सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सुधारित नाचणी बियाणे वाटपांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading