कळवा रुग्णालयातील मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी असून चौकशी नेमणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे. व आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाणे येथील रुग्णालयात घडलेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खाजगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी सदरचे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading