कळवा रुग्णालयातील मृत्यू संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आदेश

ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे 18 लोकांच्या मृत्यूसंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी कमिटी नियुक्ती करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज जाहीर केले.


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व मंत्री दीपक केसरकर यांनी घडलेल्या घटनेबद्दल ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची चौकशी केली.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की,मुख्यमंत्री महोदय यांचा फोन आल्याने मी तात्काळ विमानाने मुंबई येथे आलो. झालेल्या प्रकाराबद्दल नि:ष्पक्ष पारदर्शीपणे चौकशी करण्यासाठी शासनाने समितीची नियुक्ती केली आहे. आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, आरोग्य संचालनालयाचे संचालक, अतिदक्षता विभागाचा तज्ञ, जिल्हा शल्यचिकित्सक हे या समितीचे सदस्य असणार आहेत. या समितीने चौकशी अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत.
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पोस्टमार्टम केले जाते.18 मृत्यू झालेल्या व्यक्तीपैकी 8 रुग्ण गंभीर स्थितीमध्ये आले होते.या रुग्णांना वैद्यकीय स्थिती माहीत नसते, तेव्हा पोस्टमार्टम केले जाते. 18 रुग्ण दगावणे, ही मोठी घटना आहे. एक रुग्ण जरी दगावला तरी ते दु:खदायक असते. या हॉस्पिटलची क्षमता 500 रुग्णांची आहे तरी या रुग्णालयात 588 रुग्ण ठेवण्यात आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये 350 बेडची क्षमता आहे परंतु 150 बेडस् खाली आहेत. जिल्हा रुग्णालय बंद नसून ते मेंटल हॉस्पिटलच्या ठिकाणी हलविण्यात आलेले आहे, असे सूचना/दिशादर्शक फलक जेथे जिल्हा रुग्णालयाचे काम चालू आहे तेथे लावण्याच्या सूचना यावेळी मंत्री केसरकर यांनी दिल्या, जेणेकरुन ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यासाठी मदत होईल,असेही ते म्हणाले.
500 बेडच्या हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांचे रुग्ण येत असतात. अतिदक्षता विभागाची संख्या आधी 20 होती, आता ती 48 करण्यात आलेली आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण गंभीर झाले की,या हॉस्पिटलमध्ये पाठविले जातात. नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर रुग्णाच्या नातेवाईकांना मदत करता येत नाही. उपचारादरम्यान जर हलगर्जीपणा झाला असेल, आणि अहवालात हे सिध्द झाले तर दोषीवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या दु:खामध्ये आम्ही सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.
यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, घडलेल्या प्रकरणाबद्दल सखोल चौकशी होईल. अशा घटना पुन्हा होऊ नये, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. घडलेला प्रसंग हा निश्चितच दुर्दैवी आहे. आरोग्य सुविधा कमी पडू यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. घडलेल्या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुकत अभिजित बांगर यांनी झालेल्या घटनेची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 18 मृत्यू पैकी पुरुष 8 व महिला 10 आहेत. दोन महिन्यापूर्वी 40 परिचारिकांची भरती करण्यात आलेली आहे. परिचारिकांची रुग्णाची काळजी घेण्यासाठी खूप गरज असते. कोविड काळातील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. पूर्वी पोस्टमार्टम फक्त दिवसा करण्यात येत होते, आता पोस्टमार्टम रात्रीसुध्दा करण्यात येणार आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची गैरसोय टळणार आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनीही सांगितले आहे की, ते स्वतः मा.मुख्यमंत्री व मा.पालकमंत्री महोदयांच्या सतत संपर्कात असून त्यांच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.
00000000

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading