कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूम मधून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण

कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूम मधून चार वर्षाच्या मुलाचे एका व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास करत अवघ्या आठ तासात या मुलाचा शोध घेत, त्याच्या आई-वडिलांची भेट घडवून दिली. कचरू वाघमारे असे या अपहरणकर्ताचे नाव असून मुलाच्या हव्यासापोटी त्याने या चिमुकल्याचे अपहरण केल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या माहिती नुसार कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे करण गुप्ता आणि त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे कामं करत असून काल सकाळी शुभांगी गुप्ता ही कपडे धुण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन वरील वेटिंग रूम मध्ये आले. मात्र, साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना वेटिंग रूम मध्ये खेळताना सोडून साबण घेण्यासाठी ती स्टेशन बाहेर आली. साबण घेऊन परतल्यानंतर वेटिंग रूम मधून त्यांचा मुलगा गायब असल्याचे दिसले, आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र, मुलगा आढळून आला नाही. अखेर त्यांनी कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तात्काळ या मुलाचा शोध सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीत सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉमवर नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत जात असलेला एक व्यक्ती पोलिसांच्या नजरेस पडला आणि रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या इसमाला पकडत त्याच्या ताब्यात असलेल्या मुलाची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची विचारपूस केली असता, त्याचे नाव कचरू वाघमारे असल्याचे त्याने सांगितले. आणि त्याला चार मुली असून एकही मुलगा नव्हता त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चिमुकल्याचं अपहरण केल्याचं पोलिसांना सांगितले. सध्या पोलिसांनी कचरूला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणानंतर पुन्हा एकदा स्टेशन परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading