ऐशोरामासाठी भाड्यानं गाडी आणि कॅमेरा घेऊन त्याची विक्री करणा-याला पोलीसांनी केलं जेरबंद

ऐशोराम आणि चैनीकरता ऑनलाईन साईटवरून भाड्याने कार आणि डिजीटल कॅमेरे घेऊन परस्पर विक्री करत फसवणूक करणा-या भामट्यास ठाणे नगर पोलीसांनी अटक केली आहे. किसननगर मध्ये राहणा-या विशाल सानप यांची फेसबुकवरून ओळख काढत त्यांच्याकडून भाड्यानं नेलेला कॅमेरा परत न केल्याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीसांनी याप्रकरणी तांत्रिक माहितीचं विश्लेषण करून
सिंधुदुर्गमधील महेश भोगलेला महाबळेश्वर येथून अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने ऐशोरामात जीवन जगण्यासाठी हा प्रकार केल्याचं सांगितलं. महेश भोगले हा संगणक तंत्रज्ञ असून अस्खलित इंग्रजी बोलत असल्यानं त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसत असे. वस्तू भाड्याने घेतल्यानंतर तो मोबाईल आणि राहण्याचं ठिकाण बदलत असे. त्याने अशा ब-याच जणांकडून कार आणि डिजीटल कॅमेरे भाड्याने घेऊन परत न केल्याची कबुली दिली आहे. त्याने विकलेल्या टाटा टिएगो, शेव्हरलेट बीट, टाटा टेम्पो अशा तीन गाड्यांसह ११ डिजीटल कॅमेरे पोलीसांनी हस्तगत केले आहेत. पुण्यातही महेश भोगलेनं अशाप्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडेही त्याच्याविरोधात ९ पिडीतांची ५१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. अशाप्रकारे महेश भोगलेनं आत्तापर्यंत एकूण ९४ लाख रूपयांची फसवणूक केल्याचं पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading