एसटी कर्मचाऱ्यांसाठी ठाण्यात भाजपाचे आंदोलन

तब्बल तीन महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे हलाखीची परिस्थिती असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याबरोबरच संपूर्ण पगार देण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा भाजपाच्या वतीने खोपट एस. टी. स्टॅण्डजवळ आंदोलन करण्यात आले. आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोना आपत्तीमुळे एस. टी. चे उत्पन्न घटल्यामुळे तब्बल तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. त्यातून व्यथित झालेल्या दोघा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना काल घडली. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने आंदोलन करून एस. टी. कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यात आला. तसेच राज्य सरकारकडे संपूर्ण पगार देण्याची मागणी करण्यात आली. तसेच एस. टी. कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एस. टी. कर्मचाऱ्यांविषयी महाविकास आघाडी सरकार संवेदनशील नाही. या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. तब्बल तीन महिन्यांपासून पगार झाले नसल्याने एस. टी. कर्मचारी कुटुंबियांसह हलाखीत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार काहीही हालचाल करीत नाही, हे दुर्देवी आहे. आता दोघा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर तासाभरात पगार जमा करण्याची घोषणा करणारे परिवहन मंत्री अनिल परब हे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंची दखल घेणार आहेत का, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केला. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी असल्याचं डावखरे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading