उधारीचे पैसे मागणाऱ्या नारळ व्यापाऱ्याची हत्या करणा-या किरकोळ विक्रेत्याला 10 वर्ष सक्तमजुरी

मालाच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातुन एपीएमसी मार्केटमधील नारळ व्यापाऱ्याची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने भायखळ्याच्या किरकोळ विक्रेत्याला दहा वर्ष सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. शंकर मालुसरे असे या किरकोळ विक्रेत्याचे नाव असून मृताच्या वारसांना त्याने 2 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. हा निकाल प्रधान न्यायमूर्ती आर.एम.जोशी यांनी दिला. या खटल्यात सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले. आशिष धारानी यांचा एपीएमसी मार्केटमध्ये भाविन एंटरप्रायझेस नावाने घाऊक नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. भायखळा मार्केटमध्ये नारळ आणि बटाट्याच्या किरकोळ विक्रीचे दुकान असलेल्या मालुसरे याने 2017 मध्ये भाविन एंटरप्रायजेस कडून खरेदी केलेल्या मालाची 4 लाख रुपये थकबाकी होती. या उधारीची रक्कम घेण्यासाठी मालुसरेने 26 जून 2017 रोजी धारानी यांच्या भागिदाराला भायखळ्याला बोलावले परंतु रक्कम दिलीच नाही. पुन्हा उधारी देण्याबाबत आठवण केली असता 27 जूनला सकाळीच मालुसरे थेट वाशी मार्केटला पोहचुन शिवीगाळ करीत भांडण सुरू केले. तेव्हा, उद्भवलेल्या वादात मालुसरेने चाकुहल्ला केल्याने धारानी यांचा मृत्यु झाला. घटनास्थळी उपस्थित माथाडी कामगारांनी मालुसरेला पकडुन पोलिसांच्या हवाली केले होते. या खटल्याच्या अंतिम सुनावणीत सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी तसंच हल्लेखोराला पकडुन देणारे माथाडी कामगार आनंद नवघरे यांची साक्ष प्रमाण मानुन न्यायमूर्ती जोशी यांनी आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading