उद्या वाहतूक शाखेतर्फे नो चलान डे – नियमभंग करणा-यांचं समुपदेशन केलं जाणार

वाहतूक शाखेतर्फे उद्या नो चलान डे पाळला जाणार आहे. नो चलान डे च्या दिवशी वाहतूक नियमांचा भंग करणा-यांबरोबरच वाहन चालकांचं समुपदेशन केलं जाणार आहे. मोटार वाहन रेग्युलेशन २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या तरतुदीमध्ये बदल होऊन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व ई-चलान मशिन्स वाढीव दंडप्रणाली प्रमाणे अद्ययावत करण्यात आली आहेत. वाढीव दंडाचा फटका वाहन चालकांना बसण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, आपल्या वाहनांचे अपूर्ण कागदपत्र पूर्ण करण्यासाठी तसेच भविष्यात मोटार वाहन कायद्यान्वये कोणताही दंड वाहनचालकावर आकाराला जाऊ नये या उद्देशाने ३० डिसेंबर २०२१ हा एक दिवस “नो चलान डे” म्हणून आयोजित करण्यात आला आहे. उद्या दिवसभर ठाणे आयुक्तालयातील कोणत्याही क्षेत्रामध्ये वाहतूक संदर्भातील चलान केले जाणार नाही तसेच प्रत्येक वाहतूक चौकीच्या आणि महत्वाच्या ठिकाणी नवीन वाहतूक नियमांसंदर्भातील वाढीव दंडाच्या तरतुदीबाबत आणि सुरक्षिततेच्या योजनेबाबत वाहनचालकांचं समुपदेशन केलं जाणार आहे. नागरिकांनी नवीन दंड प्रणाली जाणून घेण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. उद्याच्या दिवशी जे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील अशा १० ते १५ वाहन चालकांचे गट तयार करून त्यांना महत्वाच्या ठिकाणी नेऊन त्यांचे वाहतूक नियमांसंदर्भात १५ ते २० मिनिटे समुपदेशन करण्यात येणार आहे. वाहनांची कागदपत्रे तपासून अपूर्ण कागदपत्रांची जाणीव करून देण्यात येईल तसेच प्रलंबित चलान असल्यास त्याची माहिती करून देण्यात येईल. नो चलान डे जरी असला तरी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading