उद्या दुपारी २.२६ ते ३.१३ पर्यंत विजय मुहुर्त

उद्या विजयादशमी दसरा, अपराजिता आणि शमीपूजन सीमोल्लंघन. उद्याचा विजय मुहुर्त दुपारी २.२६ ते दुपारी ३.१३ पर्यंत असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.  विजया दशमीचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करावा, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजया दशमीचा दिवस शुभ दिवस समजला जातो. पूर्वी या दिवशी पाटीवर सरस्वती काढून पूजा करीत असत. पूर्वी या दिवशी शिक्षणाचा प्रारंभ केला जात असे. आता या दिवशी संगणकाची पूजा केली जाते. विजया दशमीचा दिवस सीमोल्लंघनाचा आहे. आळसाकडून उद्योगीपणाकडे, व्यसनाकडून निर्व्यसनाकडे. अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे. भ्रष्टाचाराकडून नीतीमत्ता- प्रामाणिकपणाकडे, बेशिस्तीकडून शिस्तीकडे सीमोल्लंघन करावयाचे आहे. विजया दशमीच्या दिवशी वाईटाकडून चांगल्याकडे सीमोल्लंघन करता आले तर चांगले आहे.
एकदा महिषासुर राक्षसाने पृथ्वीवरील सर्व लोकांना त्रास देऊन भंडावून सोडले. त्यावेळी परमेश्वराने अष्टभुजा देवीच्या रुपाने त्या राक्षसाशी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आश्विन शुक्ल दशमीपर्यंत तुंबळ युद्ध करून त्यास ठार मारून विजय मिळविला. त्यावेळी देवीने ‘ विजया ‘ हे नाव धारण केले होते , म्हणून या दिवसास ‘ विजया दशमी ‘ असे म्हणतात. पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी म्हणून विराटाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यानी आपली शस्त्रे जंगलात शमीच्या झाडावर ठेवली होती. शेवटी अज्ञातवास संपल्यावर पांडवानी सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरून काढून घेतली आणि शमीच्या झाडाची आणि शस्त्रांची पूजा केली. तो दिवस आश्विन शुक्ल दशमीचा होता.
प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून विजय मिळविला तो हाच ‘विजया दशमीचा ‘ दिवस होता.
विजया दशमीचा हा सण आपण सर्वानी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया. निदान या दिवशी दु:ख-चिंता सारे काही विसरूया. पुढचा चिंतेचा विचार नको करुया की मागचे दु:खाचे प्रसंग नको आठवूया. एकमेकाला शभेच्छा देत वर्तमान काळातच आनंदाने जगूया आणि शक्य झाले तर इतरांच्या जीवनातही आनंद फुलवू या !

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading