उद्या एकाच दिवशी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज

उद्या बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. कार्तिक शुक्ल प्रतिपदा सूर्योदयी असेल त्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी करावी असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. तर यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज कार्तिक शुक्ल द्वितीया अपराण्हकाली असेल त्या दिवशी भाऊबीज साजरी करावी. उद्या दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी कार्तिक शुक्ल प्रतिपदा संपून द्वितीया सुरू होत आहे. दिनमानाचे पाच भाग करावे. चौथ्या भागाला अपराण्हकाळ म्हणतात. उद्या दुपारी १ वाजून ३१ मिनिटांपासून दुपारी ३ वाजून ४९ मिनिटांपर्यंत अपराण्हकाल आहे. या कालात कार्तिक द्वितीया आहे. त्यामुळे भाऊबीजही उद्याच साजरी करायची असल्याचंही दा कृ सोमण यांनी सांगितलं. उद्या कार्तिक शुक्ल प्रतिपदा, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, अभ्यंगस्नान, वहीपूजन, अन्नकूट, गोवर्धन पूजन, आनंदनाम विक्रम संवत् २०७९, महावीर जैन संवत् २५४९ , यमद्वितीया, भाऊबीज आहे. विक्रम संवत् २०७९ या नूतन वर्षाचा प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक वर्षांचा प्रारंभ होतो त्यादिवशी आपण नवीन वर्षारंभ साजरा करीत असतो. त्या दिवसाला आपण ‘ चैत्री पाडवा ‘ असे म्हणतो. गुजरात आणि उत्तर भारतात विक्रम संवत् पाळला जातो. कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा विक्रम संवत् वर्षाचा पहिला दिवस असतो , या दिवसाला‘ दिवाळी पाडवा ‘ म्हणून ओळखले जाते. उद्या विक्रम संवत् २०७९ चा प्रारंभ होत आहे. या नूतन विक्रम संवत्सराचे नाव ‘ आनंद असे आहे. विक्रम संवत् हा उज्जयिनीस विक्रमादित्य राजाने सुरू केला. शालिवाहनाच्या शकामध्ये १३५ मिळवले की विक्रम संवताचे वर्ष येते. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. व्यापारी लोक शुभ चौघडी वेळ पाहून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेल्या नवीन वह्यांवर बलिप्रतिपदेपासून हिशेब लिहिण्यास प्रारंभ करतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading