उद्यापासून घरोघरी तिरंगा उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी उद्यापासून सुरू होणा-या घरोघरी तिरंगा अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी केल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून स्वराज्य महोत्सवास प्रारंभ झाला असून त्यामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायती यांसोबतच विविध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी, पोलिस आणि क्रिडा विभागाच्या वतीने आयोजित मॅरेथॉन, रॅली, शहर आणि जिल्ह्यातील कार्यालये आणि ऐतिहासिक वास्तूंना केलेली रोषणाई, वृक्षारोपण आदी विविध उपक्रमांमुळे वातावरण भारावून गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वराज्य महोत्सवा निमित्त अनेक विभागांनी कल्पक उपक्रम राबवून अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील भातसा आणि तानसा या धरणातील विसर्गावर तिरंगा रोषणाईची अभिनव संकल्पना साकारणारा ठाणे जिल्हा पहिला असेल असे त्यांनी सांगितले.
स्वराज्य महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत 21 विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे देशभक्तीपर गीतांचा जागर हा कार्यक्रम असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास त्याचे आयोजन करण्यात आल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. 15 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम होणार आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी घरे, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फुर्तीने उभारणी करण्यासाठी घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही त्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन घरावर तिरंगा ध्वज लावावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्सव ७५ ठाणे या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा, मान्यवरांच्या मुलाखती, टॉक शो आदी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्वराज्य महोत्सव याअंतर्गत गावागावात प्रभात फेरी, शालेयस्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा, पालक शिक्षक सभा यांचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी मेळावे, महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन, स्वच्छता मोहिम आदी विविध उपक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading