उद्याच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली असून न्यू होरायझन हायस्कूल येथे ही मतमोजणी होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदार आहेत. यापैकी ११ लाख ६७ हजार २६२ म्हणजे ४९.२५ टक्के मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला आहे. यामध्ये ६ लाख ४७ हजार ४७१ पुरूष तर ५ लाख १९ हजार ७७९ महिला मतदार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात ५ हजार २८३ पोस्टल बॅलेट मतदार असून त्यापैकी ३ हजार २२३ मतपत्रिका तर इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट एकूण ६३० असून यापैकी २३२ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सेना दलाचे अधिकारी आणि कर्मचारी येतात. मतमोजणीसाठी १५ टेबल्स प्रत्येक विधानसभा मतदारसंघात लावली जाणार आहेत. म्हणजे ६ विधानसभा मतदारसंघात ८४ टेबल्स लावली जातील. त्याचप्रमाणे निवडणूक अधिका-यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक वेगळं टेबल असणार आहे. या टेबलावर टपाली मतपत्रिका, इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट मोजल्या जाणार आहेत. प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरिक्षक आणि शिपाई असे कर्मचारी असणार आहेत. व्हीव्हीपॅट यंत्रातील चिठ्ठ्यांच्या मोजणीसाठीही प्रत्येकी १ टेबल लावण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading