ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी लागणार जवळपास १२ तासांचा अवधी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी जवळपास १२ तासांचा अवधी लागणार असून प्रत्यक्षात निकाल जाहीर होण्यासाठी पुढे आणखी २ तासाचा कालावधी लागू शकतो. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार मतमोजणी करावी लागणार असल्यामुळं हा कालावधी लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मतं मोजण्यासाठी प्रत्येक फेरीकरिता २० मिनिटं लागणार आहेत. त्यामुळं ६ विधानसभा मतदारसंघातील मतं मोजण्यासाठी ६६० मिनिटं लागण्याचा अंदाज आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील पहिल्या फेरीचा निकाल साधारणत: ११ वाजता हाती येईल असं दिसत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरारोड विधानसभा क्षेत्रात ३१, ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात ३१, ठाणे विधानसभा मतदारसंघात २७, कोपरी-पाचपाखाडी २८, ऐरोली ३३ तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २८ फे-या होणार आहेत. त्याचप्रमाणे टपाली आलेल्या मतपत्रिका मोजण्यासाठी ६ ते ७ तास, इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट मोजण्यासाठी ६ तास त्याचप्रमाणे ६ विधानसभा क्षेत्रातील व्हीव्हीपॅटमधील मतं मोजण्यासाठी १ तास लागणार आहेत. ही मोजणी झाल्यानंतर त्याची माहिती सुविधा अॅपमध्ये द्यायची आहे. प्रत्येक फेरीची माहिती सुविधा अॅपमध्ये दिल्यानंतरच पुढच्या फेरीच्या मोजणीची सुरूवात करता येणार आहे. तसंच मतदान यंत्रावरील यापैकी कोणीही नाही या पर्यायाची मोजणी करावी लागणार असून याची पडताळणी झाल्यानंतरच निकाल जाहीर करता येणार आहे. या सर्व क्लिष्ट प्रकारामुळे मतमोजणी करण्यास वेळ लागणार असल्यामुळे निकाल घोषित होण्यासही वेळ होणार आहे. यंदा विशेष म्हणजे निवडणूक निरिक्षकांना निकाल जाहीर करण्यासाठी अधिकृत करण्यात आलं असून यामुळं निवडणूक आयोगाची परवानगी येईपर्यंत विजयी उमेदवाराच्या नावाच्या घोषणा रखडणार नाहीत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading