आपल्या भारतात परिस्थिती खूप चांगली – २२ देश फिरलेल्या महिलांची भावना

सर्व देश फिरल्यावर असं वाटतं की आपल्या भारतात खूप चांगली परिस्थिती आहे अशा भावना २२ देशांना मोटारीने भेट देणा-या महिलांनी व्यक्त केल्या. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये या महिलांनी आपले अनुभव कथन करताना या भावना व्यक्त केल्या. माधुरी सहस्रबुध्दे आणि त्यांच्या तीन मैत्रिणींनी दिल्ली ते लंडन असा २३ हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास स्वत: मोटर चालवत केला. या प्रवासात त्यांनी २२ देशांना भेटी दिल्या. देशोदेशीच्या आई समजून घेणे हा त्यांचा उद्देश होता. माधुरी सहस्रबुध्दे यांच्याबरोबर शीतल वैद्य, उर्मिला जोशी, माधवी सिंग तोमर यांनीही हा प्रवास केला. पाकिस्तानमधून जाण्यास परवानगी न मिळाल्यामुळे लांबच्या मार्गानं चीनला जावं लागलं. त्यामुळं १० हजार किलोमीटरचा अधिक प्रवास करावा लागला. चीनमधून जातानाही खूप त्रास झाला. चीनमध्ये व्हीसा देताना आणि बॉर्डर क्रॉस करताना खूप त्रास दिला गेला. केवळ देवाच्या कृपेनेच आम्ही सुटलो. याउलट कझाकिस्तानमध्ये खूप चांगला अनुभव आला. कझाकिस्तानमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलो असताना अनेक पेट्रोलपंपावर नकार मिळाला. तेव्हा एका युवकानं बेन्झीन मागण्यास सांगितलं. तेव्हा तिथे पेट्रोलला बेन्झीन म्हणतात हे आम्हांला कळले. असे अनेक किस्से या चौघींनी यावेळी कथन केले. मात्र सर्व देशांमध्ये फिरून आम्हांला जाणवलं की महिलांवर सगळीकडेच खूप बंधनं असतात. त्यांच्यावर दडपण असतं. त्यावेळी असं वाटतं की आपल्या भारतात खूप चांगली परिस्थिती आहे. यावेळी त्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून हा प्रवास उलगडून दाखवला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading