आपदा मित्रांनी मासुंदा तलावात घेतले पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना आज पूरपरिस्थितीतील बचाव कार्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. मासुंदा तलावात बोटीद्वारे बचाव कार्य, पाण्यात सापडलेल्यांना कसे वाचवायचे, पोटात पुराचे पाणी गेल्यावर ते कसे काढायचे यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती काळात मदतीसाठी ठाणे जिल्ह्यात आपदा मित्रांची तुकडी तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपदा मित्र प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु असून या प्रशिक्षणांचा एक भाग म्हणून आज आपदा मित्रांना मासुंदा तळाव पाळी येथे हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पूर आलेल्या ठिकाणी पूर विमोचन बोट घेऊन बचाव कसा करावा, जीव रक्षक कवच कसे घालावे, बचाव कार्य करताना कोणती दक्षता घ्यावी, पाण्यातून बचाव केलेल्या व्यक्तीला प्रथमोपचार म्हणून कोणती कृती करावी याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. तसेच या आपदा मित्रांकडून प्रत्यक्ष कार्यही करून घेण्यात आले.
निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांचे प्रशिक्षण होत असून होत असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख ओमकार वैती, महानगर पालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अविनाश सावंत, यशदा येथील मास्टर ट्रेनर अजित कारभारे, आपत्ती विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आपदा मित्र प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना वैती म्हणाले की, वेधशाळेकडून वर्तविलेला अंदाज लक्षात घेऊन संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे. पुराची पूर्वसुचना मिळताच उपलब्ध साधनांचा वापर करुन जिवीत आणि वित्तहानी होणार नाही यांची काळजी आपदा मित्रांनी घ्यावी. पूर येऊन गेल्यावर जखमींना मदत करण्यासाठीही योग्य खबरदारी घ्यावी.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.अनिता जवंजाळ म्हणाल्या की, अतिवृष्टी, धरणफुटी, ढगफुटी यामुळे येणाऱ्या आपत्तीसाठी आपदा मित्रांची मदत महत्वाची ठरणार आहे. पूरपरिस्थितीमध्ये नागरी जीवन विस्कळीत होते. ते पूर्वपदावर आणण्यासाठी आपदा मित्र उपयुक्त ठरतील. पुरभागात बचाव कार्यासाठी जीव रक्षकांना मदतीसाठी बोलविण्यासाठी 112 किंवा 108 किंवा 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading