आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांनी घाबरून जाऊ नये यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न रेल्वेचा असेल – अशोक कन्सल

आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांनी घाबरून जाऊ नये यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न रेल्वेचा असेल अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कन्सल यांनी ठाण्यात बोलताना दिली. पावसाळ्यात निर्माण होणा-या परिस्थितीमध्ये बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी रंगीत तालमीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कन्सल बोलत होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय भागांवर चार ठिकाणी पूरग्रस्त पाण्याचा प्रवेश रोखण्यासाठी भिंत बांधणे, ४ लाख घनमीटर घाण आणि कच-याची विल्हेवाट लावणे अशा पायाभूत सुधारणांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. पावसाळ्या दरम्यान बचाव आणि मदतकार्य करण्यास रेल्वेची पथकं तयार आहेत. ही तयारी कशी आहे याची प्रात्यक्षिकं मासुंदा तलाव येथे दाखवण्यात आली. रेल्वेनं यासाठी रेल्वे पूर मदत दल तयार केलं आहे. शक्य तिथे आपत्तींना प्रतिबंध करणे अथवा त्याचे परिणाम कमी करणे तसंच योग्य नियोजन करून परिणामांचा सामना करणे हा यामागचा उद्देश आहे. यासाठी रेल्वेनं ५ मोटारसह असलेल्या बोटी खरेदी केल्या आहेत. प्रत्येक रेल्वे पूर मदत दलात एक उपनिरिक्षक, १ सहाय्यक उपनिरिक्षक, ६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या सगळ्यांना एनडीआरएफ कडून प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीच्या अंदाजादरम्यान हे पथक पूरस्थिती असेल त्या ठिकाणी पोचेल. हे पथक नागरी प्रशासन, जीएआरपी आपत्ती व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षांशी संपर्क साधेल असं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी मासुंदा तलावात मदतकार्याची रंगीत तालीम सादर करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading