आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्षानिमित्त जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम पौष्टिक तृणधान्याच्या लागवड क्षेत्र वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी

बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्य चांगले रहावे यासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या पौष्टिक तृणधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. तसेच ही पौष्टिक तृणधान्ये आणि त्याचे प्रक्रिया केलेले पदार्थ जनतेला सहजरित्या मिळावेत यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या वर्षात तृणधान्याचे उत्पादन वाढविणे आणि त्याचा वापर वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पुढील वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त 2023 मध्ये जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये तृणधान्य लागवड आणि त्यावरील प्रक्रियेसंदर्भात कार्यशाळा, वरी आणि नाचणी पदार्थांची पाककृती स्पर्धा आणि प्रशिक्षण, तृणधान्याचा आहारातील वापर, त्याचे महत्त्व यासंबंधी पथनाट्य, रॅली, निबंध/वक्तृत्वस्पर्धा, मिलेट जत्रा, प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास इच्छुकांसाठी प्रशिक्षण, तृणधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम, शेतकरी मेळावे, पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, खरेदीदार आणि विक्रेता यांचे संमेलन, खरेदी विक्री केंद्र स्थापन करणे असे विविध उपक्रम या वर्षभरात राबवण्यात येणार आहेत. बदलत्या जीवनशैलीत तृणधान्याचा आहारात समावेशासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेषतः मुलांच्या आहारात त्याच्या समावेशासाठी नैसर्गिकरित्या आवाढ निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करून बनविलेले पदार्थ तसेच तृणधान्य विक्रीसाठी कायमस्वरुपी केंद्र उभारावेत. आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या पदार्थांच्या वापरासाठी जनजागृती करावी. यासंबंधीचा आराखडा तयार करावा असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. तृणधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषि विभागाने विशेष मोहिम हाती घ्यावी. उन्हाळी हंगामात 15 टक्के, खरीप हंगामात किमान 30 टक्के तरी तृणधान्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे. यासाठी उत्पादकांना प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढविणे, खत,बी बियाणे पुरविणे आदीचे सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले. जिल्हास्तरीय समितीतील सदस्यांनीही पुढील वर्षी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासंदर्भात चर्चा करून हे उपक्रम लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading