असिस्टंट मेट्रन छळप्रकरणी उपायुक्त विश्वनाथ केळकरांची हकालपट्टी करण्याची भाजपाची मागणी

ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील असिस्टंट मेट्रनच्या छळवणूकप्रकरणातील आरोपी पालिका उपायुक्त (आरोग्य) विश्वनाथ केळकर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाच्या युवती विभागाच्या प्रभारी व प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज केली. या प्रकरणात संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या पाठिशी उभे न राहणारे सत्ताधारी व महापालिका प्रशासनावरही वाघ यांनी तीव्र टीका केली.
महापालिका आयुक्त विपिन शर्मा व पोलिस आयुक्त जय जीत सिंग यांची चित्रा वाघ यांनी संबंधित असिस्टंट मेट्रनसह भेट घेतली. तसेच या प्रकरणाकडे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत उपायुक्त केळकरांच्या हकालपट्टीची मागणी केली.
ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून वर्षभरापूर्वी संबंधित महिला सेवेत रुजू झाली. कालांतराने तिला असिस्टंट मेट्रनपदी बढती मिळाली. मात्र, महापालिकेचा उपायुक्त विश्वनाथ केळकर याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. या प्रकाराबाबत तिने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या सेवेतील डॉ. प्रज्ञा जाधव, डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांच्याकडे तक्रार केल्यावर वरिष्ठांविरोधात कोण बोलणार, असा पवित्रा त्यांनी घेतला. तर महापालिका आयुक्तांसह सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून दखलही घेण्यात आली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून संबंधित महिला न्याय मिळविण्यासाठी वणवण फिरत आहे, याकडे वाघ यांनी लक्ष वेधले. इतकेच नव्हे तर
महिलेने तक्रार केल्यानंतर तिला कामावरून काढूनही टाकण्यात आले. या महिलेची कागदपत्रे अपुरी असल्याचे सांगण्यात आले होते. या कागदपत्रांची वर्षभर छाननी का करण्यात आली नाही, असा सवाल वाघ यांनी केला. महापालिकेच्या विशाखा समितीकडूनही महिलेच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे महापालिका आयुक्तांकडून आता सांगण्यात येत आहे. तर पोलिसांच्या परिमंडळ 5 कडून विशाखा समितीचा अहवाल नसल्याने तक्रार दाखल करण्यास टोलवाटोलवी केली गेली, याबद्दल चित्रा वाघ यांनी खंत व्यक्त केली.
या प्रकरणी भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त यांची आज भेट घेतली. तसेच उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली. त्यावर विशाखा समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली. या प्रकरणातील आरोपी विश्वनाथ केळकर यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही वाघ यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading