अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वागळे इस्टेट भागातील दोन दूध डेअरींची अचानक केली तपासणी

जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या मार्फत जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वागळे इस्टेट भागातील दोन दूध डेअरींची अचानक तपासणी केली. अस्वच्छ वातावरणात पनीर तयार करत असल्याचे यावेळी आढळून आले. या कारवाईत सुमारे 4 लाख 1 हजार 374 रुपये किंमतीचे पनीर, दूध आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली आहे. अन्न आणि औषध प्रशासन ठाणे विभागाने वागळे इस्टेट मधील केवला डेअरी या उत्पादक पेढीची अचानक तपासणी केली असता या ठिकाणी अस्वच्छ वातावरणात पनीरचे उत्पादन होत असल्याचे आढळून आहे. या ठिकाणी पनीर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे म्हशीचे दूध आणि पनीर या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेऊन म्हशीचे ५९८ लिटर दूध आणि ७९ किलो पनीर असा एकूण ४५ हजार ३१६ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. वागळे इस्टेट येथील यादव मिल्क प्रोडक्ट्स या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनच्या पथकाने अचानक तपासणी केली असता या पेढीत पनीर आणि पनीर अॅनलॉग तयार करीत असल्याचे आढळले. हे उत्पादन अत्यंत अस्वच्छ वातावरणात विनापरवाना करीत असल्याने या ठिकाणी स्वच्छता करून परवाना घेईपर्यंत पेढी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी पनीर, पनीर ॲनलॉग, स्कीमड मिल्क, सायट्रिक ॲसिड, मोनोसोडियम ग्लोउटेण, रिफाईन्ड पामोलीन ऑईलचे नमुने घेण्यात आले. यावेळी सुमारे ३ लाख ५६ हजार ५८ रुपये किंमतीचे पनीर, पनीर अनॅलॉग, दूध, रिफाईंड पामोलिव्ह ऑइल आणि इतर साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच ३८२ किलो पनीर आणि पनीर अँनलॉग, २८ लिटर दूध, सायट्रिक असिड, 2893.4 किलो रिफाईंड पामोलिव्ह ऑईल आदी साठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी उत्पादन करताना कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे, तपासणीवेळी आढळून आले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading