अनधिकृत बांधकाम हटविण्यास गेलेल्या कर्मचार्‍यांना दमदाटी

दिवा प्रभाग समिती हद्दीतील अनधिकृत बांधकाम हटविण्यास गेलेल्या महापालिका कर्मचार्‍यांच्या कारवाईमध्ये तथाकथीत समाजसेवकांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचार्‍यांना शिविगाळही करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालिकेच्या कर्मचार्‍यांच्या कामात अटकाव घालणार्‍यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे. दिवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. ही बांधकामे निष्कासित करण्यासाठी उपायुक्त अश्विनी वाघमुळे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, सोमवारी त्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. कारवाई सुरु असतानाच नाज गोलंदाज आणि अहमद नेता या दोघांनी घटनास्थळी येऊन कर्मचार्‍यांना कारवाईपासून अटकाव करण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई पैसे घेऊन करीत असल्याचा आरोप करीत काही कर्मचार्‍यांना शिविगाळही केली. या प्रकारामुळे अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरु केली असतानाच दुसरीकडे तथाकथीत समाजसेवकांकडून असे कृत्य होत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कारवाईमध्ये अडथळा निर्माण करणार्‍या या लोकांवर भारतीय दंड विधान 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी पालिका अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा; जेणेकरुन आगामी काळात अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांना अशा समाजसेवकांची शिविगाळ सहन करण्याची वेळ येणार नाही, असे एका कर्मचार्‍यानेच सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading