अखेर घोडबंदर रोड महामार्गावर अड़थळा होणार्या वनखात्याची जमिन महानगरपालिकेकडे होणार वर्ग

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून वनमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये घोडबंदर मार्गावरील मानपाडा, कासारवडवली व गायमुख या परिसरामध्ये वनखात्याची जमिन असून ती घोडबंदर महामार्गावर अड़थळा ठरत होती. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेला वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात आमदार श्री. प्रताप सरनाईक व महानगरपालिकेचे अधिकारी वनखात्याकडे पाठपुरावा करीत होते. परंतू, आज झालेल्या बैठकीमध्ये वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवर यांनी वनमंत्र्याचे प्रधान सचिव श्री. डी.वेणुगोपाल रेड्डी, अपर प्रधान सचिव श्री. विकास खरगे यांना सुचना देऊन ही जमिन ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिल्याने आता हा प्रश्न निकाली निघाला असल्याने लवकरच ठाणे महानगरपालिकेकडे सदरहू जमिन हस्तांतरीत होणार आहे त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुक समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

वास्तविक पाहता, मानपाडा, कासारवडवली, गायमुख या परिसरामध्ये येणारी वनखात्याची काही जमिन ही घोडबंदर महामार्गावर मधोमध येत होती. पुर्वी त्या जमिनीचा त्रास होत नव्हता, परंतू, दिवसेंदिवस वाढत जाणार्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढल्याने, तसेच सदरहू जमिन ही मधोमध असल्याने पावसाळ्यात उंचावरून येणारे, दगड-धोंडे व मधोमध असणार्या भिंतीवर तेथे भरधाव वाहणारी वाहने धडक दिल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत होते.

घोडबंदर महामार्गावरील वनखात्याची जमिन ताब्यात आल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने लवकरात लवकर त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी गटार व रस्त्याची बांधणी करून जनतेला हा रस्ता खुला करावा, अशी अपेक्षा आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी व्यक्ती केली. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला वनखात्याच्या जमिनीचा तिढा शिवसेना-भा.ज.पा. युतीच्या सरकारमुळे यशस्वीपणे सोडविल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी समस्त ठाणेकरांच्या वतीने आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading