वेदरशेडवरील कारवाईला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं

ठाणे महापालिकेच्या वेदरशेडवरील कारवाईला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं आहे.  महापालिका क्षेत्रातील इमारतींवर पूर्वीपासून पावसापासून संरक्षण करण्यासाठी वेदरशेड उभारण्यात येत आहेत. वेदरशेडवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनानं काढले आहेत. महापालिकेच्या या निर्णयाला शहरातून तीव्र विरोध होत आहे. यापूर्वी पालिका प्रशासनानं पावसाळ्याच्या चार महिन्यासाठी तात्पुरते शेड उभारण्यास परवानगी दिली आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या इमारतीतील सर्वसामान्य रहिवाशांना दरवर्षी येणारा खर्च परवडणारा नाही. ठाणे शहरात अनेक जुन्या इमारती आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गीय या इमारतीत वास्तव्य करतात. पावसाळ्यात इमारतींना गळती लागते. त्यापासून संरक्षण करण्यासाठी गच्चीवर वेदर शेड उभारण्यात येतात. परंतु प्रशासनाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय ठाणेकरांवर अन्याय होणार असल्याचं आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नागरिकांच्या मागणीनुसार गच्चीवर कायमस्वरूपी वेदरशेड उभारण्याची परवानगी देण्याबाबत महापालिकेनं २०१४ मध्ये ठराव करून नगर विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. तब्बल चार वर्षे उलटून गेली तरी या ठरावाबाबत शासनानं ठोस निर्णय घेतला नाही आणि ठाणे पालिका प्रशासनाने याबाबत पाठपुरावा केला नाही. सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे. चार वर्षापूर्वी पालिकेनं पाठवलेला ठराव मंजूर झाल्यास वेदर शेड नियमित होणार आहेत. त्यामुळं जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत दंडात्मक कारवाईचा निर्णय स्थगित ठेवण्यात यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading