वागळे इस्टेट मध्ये ४ ऑटो रिक्षा आणि ४ दुचाकी जाळणा-या अजय बूबकला श्रीनगर पोलीसांनी अटक केली असून रागाच्या भरात त्याने आपलीच गाडी जाळताना हा प्रकार केल्याचे उघड झालं आहे. काल पहाटेच्या सुमारास वागळे इस्टेट येथे ४ ऑटो रिक्षा आणि ४ दुचाकी जळून भस्मसात झाल्या होत्या. ठाण्यामध्ये गाड्या जाळण्याच्या प्रकारात वाढ झाल्यामुळे हा प्रकार घडल्यामुळे पोलीसांनी अतिशय जलद गतीने याप्रकरणी तपास केला. अजय बूबक याची दुचाकी त्याचे भाऊ सुभाष बूबक वापरत होते म्हणून अजय बूबक याने सुभाष बूबक यांना तुम्ही ही गाडी कशी वापरता हे बघतो असे बोलून दुचाकीची मागणी केली. या दुचाकीचे हफ्ते सुभाष बूबक भरत असल्यानं त्यांनी गाडी देण्यास नकार दिला. त्यामुळे अजय बूबक यानं काल पहाटे ३ च्या सुमारास भावानेच उभी करून ठेवलेली दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. याच दुचाकीतील पेट्रोल काढून गळणा-या पेट्रोलवर माचिसची काडी टाकून ही दुचाकी पेटवून दिली. या दुचाकीच्या आजूबाजूला असलेल्या ४ ऑटो रिक्षा आणि ४ दुचाकी या आगीत सापडल्या आणि त्या भस्म झाल्या. पोलीसांनी अजय बूबकची माहिती काढून त्याला काल अटक केली. रागातून त्याने केलेल्या या कृत्याचा फटका नाहक इतरांनाही बसला.
