कल्याण-डोंबिवली-शीळ-तळोजा या मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वीच मंजुरी दिली असताना काल डोंबिवली- तळोजा मेट्रो मार्गाच्या नव्या डीपीआरला मंजुरी देण्याची पुन्हा घोषणा केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. हा नवा मेट्रो मार्ग असणार की यापूर्वी मागणी केल्याप्रमाणे आधीच्या मेट्रो मार्गात बदल करून नवा डीपीआर केला जाणार आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करणे गरजेचे असल्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. २१ ऑक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या मेट्रो मार्गाचे सविस्तर सादरीकरण शिंदे यांनी केले होते. कल्याण, डोंबिवली, २७ गावे, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसराची लोकसंख्या प्रत्येक दशकात कशा प्रकारे वाढत आहे याची आकडेवारी सादर करतानाच कुठल्या मार्गाने मेट्रो नेल्यास अधिकाधिक लोकसंख्येला तिचा लाभ होईल याचे सादरीकरण केले होते. त्याच बैठकीत तात्काळ या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील दाखवत मुख्यमंत्र्यांनी डीपीआर तयार करण्याचे आदेश मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला दिले होते. डीपीआर नुसार प्रस्तावित मार्ग सूचक नाका-मलंगगड रस्ता-खोणी-तळोजा बायपास-तळोजा असा असून त्याऐवजी कल्याण एपीएमसी-डोंबिवली-शीळ-तळोजा असा मेट्रो मार्ग करण्याची आग्रही मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. त्यानंतर काल कल्याण येथे झालेल्या कार्यक्रमात मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी डोंबिवली मार्गे तळोजा मेट्रोचा डीपीआर तयार करून तातडीने मंजुरी देण्याची घोषणा केल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे.
