मुंब्र्याहून ठाण्याच्या दिशेनं जाणा-या धिम्या मार्गावरील बोगद्याजवळ असलेले खांब हटवण्याचे रेल्वेचं आश्वासन

मुंब्र्याहून ठाण्याच्या दिशेनं जाणा-या धिम्या मार्गावरील बोगद्याजवळ असलेले खांब हटवण्याचे अथवा दूर करण्याचं आश्वासन रेल्वेनं दिलं आहे. या खांबांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्यानं हे खांब हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली होती. गेल्या आठवडाभरात धिम्या मार्गावरील दुस-या बोगद्यानजिक असलेल्या खांबांना धडक लागून ४ तरूण आणि एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल्वेच्या विभागीय अभियंत्यांना हे खांब हटवण्यासाठी निवेदन दिलं होतं. सकाळ, संध्याकाळी गर्दीच्या वेळी एखादी गाडी रद्द झाली तर चाकरमानी मिळेल त्या गाडीनं प्रवास करतात. त्यामुळं दरवाज्यात लटकल्याने खांबावर आदळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं हे खांब हटवण्याची मागणी करण्यात आली होती. रेल्वेच्या विभागीय अभियंत्यांनी हे खांब हटवण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र ते जर शक्य झालं नाही तर ते रेल्वे रूळापासून दूर उभे करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत खांबानजिकच्या वळणावर गाडी हळू चालवण्याच्या सूचना मोटरमनला देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: