सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार सुरू करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रात लेडीज डान्स बार सुरू करून देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये सामाजिक स्वास्थ्याला लागलेला कॅन्सर दूर करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बार बंदीचा निर्णय घेतला होता. घरं दारं संसार उध्वस्त होत होती. सामाजिक स्वास्थ्य खराब होत होतं. अशा परिस्थितीमध्ये बार बंद झाले. पण ते आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शासनानं याप्रकरणी योग्य पध्दतीनं बाजू न मांडल्यानं हा निर्णय झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर बार पुन्हा सुरू करणं हे शासनाला शोभणारं नाही. यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. वकीलच भांडला नाही तर निकाल विरोधात जाणारच होता. समाज व्यवस्थेला लागलेला कॅन्सर दूर व्हावा म्हणून केलेला उपाय फोल ठरला आहे. जनतेनं आता हे रोखण्यासाठी काय तो निर्णय घ्यावा, ज्या सत्तेनं हे बारचं दार उघडलंय त्यांचीच दारं बंद करण्याचा निर्णय तुम्हांला आम्हांला घ्यावा लागणार आहे. व्यवहार कितीचाही होवो पण महाराष्ट्रात डान्स बार सुरू करू देणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
