भरधाव दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील पोलीस अधिकारी जायबंदी झाल्याची घटना खेवरा सर्कल येथे घडली. अजय तेलोंडे हे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ईदच्या दिवशी सुभाषनगर परिसरात बंदोबस्तावर तैनात असलेले तेलोंडे दुपारी जेवणाचा डबा आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरून पडल्याने तेलोंडे जखमी झाले. अपघातानंतर धडक मारणारा दुचाकीस्वार पसार झाला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
