भंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस अटक

विविध राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात भंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस पोलीसांनी अटक केलं आहे. भिवंडी येथील नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्या चोरीच्या काही घटना घडल्या होत्या. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. काही खाजगी कंपनीच्या स्क्रॅप गाड्या काही व्यक्तींनी विकत घेतल्या होत्या. नंतर बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं या गाड्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात आल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणाचा तपास करताना खाजगी कंपनीची भंगार वाहनं खरेदी करणारा सचिन सोनावणे हा बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं बीडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करणारा आरटीओ एजंट सय्यद अहमद या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे एकूण ३६ वाहनांची बनावट कागदपत्रं मिळाली. या गुन्ह्याच्या तपासात ४२८ व्यावसायिक वाहनांची महाराष्ट्र आणि इतर राज्यात बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं नोंदणी करण्याचं निष्पन्न झालं. यापैकी २४ वाहनं जप्त करण्यात आली आहेत तर उर्वरीत वाहनं जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. ५३ प्रवासी वाहनं बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं नोंदणी झाली असून यापैकी १० वाहनं जप्त करण्यात आली आहेत. बीड प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरिक्षक या पदावर कार्यरत असताना राजेंद्र निकम आणि निलेश भगुरे या दोन मोटार वाहन निरिक्षकांनी अस्तित्वात नसलेली वाहनं आणि भारतात निर्बंध असलेली लेफ्ट हँड स्क्रॅप वाहनं बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणीच्या तपासात २२ कोटी ३९ लाखांची ३४ वाहनं जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये शासनाचा सुमारे ३२ लाखांचा विक्रीकर बुडाला असल्याचं पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading