पोलीसांना आहे त्यापेक्षा जास्त फूटाचं घर देण्यास म्हाडाची तयारी

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असणा-या पोलीस वसाहतीत राहणा-या पोलीसांच्या घराचा प्रश्न पुढील दोन-तीन महिन्यात मार्गी लागणार असून पोलीसांना घर देण्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीसांच्या घराच्या प्रश्नावर म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीनंतर म्हाडा आणि पोलीस आयुक्तालय याबाबत सकारात्मक आहेत. उदय सामंत यांनी वर्तकनगर येथील जागेची पाहणी केली आणि त्यानंतर एका बैठकीचंही आयोजन केलं होतं. गेल्या १० वर्षापासून पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्तकनगर पोलीस वसाहत म्हाडानं विकसित करावी आणि पोलीसांच्या कुटुंबियांना आहे त्यापेक्षा जास्त फूटाचं घर मोफत मिळावं अशी मागणी करण्यात आली असता म्हाडाच्या अधिका-यांनी ही बाब मान्य केल्यामुळे पोलीस वसाहतीच्या विकासाचा मार्ग निकालात निघाला आहे. येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत पोलीसांना किती जास्त जागा देता येईल याची माहिती दिली जाईल असं म्हाडातर्फे सांगण्यात आलं. आमदार प्रताप सरनाईकही या बैठकीत सहभागी झाले होते. या प्रश्नाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: