पारसिक डोंगरावरील कातळावर लेझरच्या सहाय्यानं आकर्षक रोषणाई

पारसिक चौपाटीला लागून असलेल्या विस्तीर्ण आणि नयन मनोहर अशा पारसिकच्या डोंगराचं रूप आकर्षक विद्युत रोषणाईनं मोहरणार आहे. या डोंगरावर लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मुंब्रा देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या भव्य कातळावर भारतीय सण परंपरा यांच्या प्रतिमा प्रतित करणारी आकर्षक विद्युत रोषणाई, विविध संदेश दाखवण्यात येणार आहेत. भारतातील अशा पध्दतीचा हा पहिलाच प्रकल्प आहे. ठाणे शहराला निसर्गाचा अलौकीक ठेवा लाभला आहे. येऊरचं घनदाट जंगल, विस्तीर्ण खाडी आणि पारसिकचा कडा हा तर ठाण्याची शान आहे. हा पारसिकचा कडा भारतीय संस्कृती आणि परंपरेची अनेक प्रतिके विद्युत रोषणाईच्या माध्यमातून आपल्या खांद्यावर मिरवणार आहे. पारसिक रेतीबंदर येथे आंतरराष्ट्रीय किर्तीची चौपाटी निर्माण करण्याचं काम सुरू आहे. या चौपाटीला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पारसिक चौपाटीवरून पारसिक डोंगराचं मनोहारी रूप सायंकाळ आणि रात्रीच्या वेळी पर्यटकांना अनुभवता यावं यासाठी ही आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. ही विद्युत रोषणाई इथले सण, परंपरा, राष्ट्रीय सण यावर आधारीत असणार आहे. लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असल्याचं त्याचं महत्व अधिक आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी पाहणी करून अशा प्रकारची विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण डोंगरावर आकर्षक एलईडी लाईटस् लावण्यात येणार आहेत. तर डोंगरावरील मुंब्रा देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या भव्य आणि विस्तीर्ण कातळावर लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वेगवेगळे संदेश, प्रतिमा प्रतिबिंबीत करण्यात येणार आहेत.

 

Leave a Comment

%d bloggers like this: