पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कल्याणमध्ये कल्याण-भिवंडी आणि दहीसर-मीरारोड या मेट्रोचं भूमीपूजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटण दाबून हे भूमीपूजन केलं. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना या सोहळ्याचं आमंत्रण न दिल्यामुळं शिवसेनेनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात चक्क मराठीतून केली. महाराष्ट्रातील संतांनी भक्तीमार्गातून समाज प्रबोधन करण्याचं काम केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांनी आपल्या सरकारनं मेट्रोचा स्पीड वाढवण्याचं काम केल्याचं सांगत आघाडी सरकारवर टीका केली. मुंबईमध्ये पहिल्या मेट्रोचं काम २००६ मध्ये सुरू झालं तर मेट्रो प्रत्यक्ष सुरू व्हायला ८ वर्ष लागली. ८ वर्षात अवघ्या ११ किलोमीटरचं काम झालं तर आमच्या सरकारनं २०० किलोमीटरहून अधिक लांबीची मेट्रो कमी वेळात बांधण्याचं काम केलं असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. प्रधानमंत्री आवास योजनेमुळं सामान्यातल्या सामान्य माणसाच्या घराचं स्वप्न साकार होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं.
