नवीन ठाणे वसवण्याला राष्ट्रवादीचा विरोध

नवीन ठाणे वसवण्याचा प्रस्ताव फक्त बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी असून राष्ट्रवादी काँग्रेसनं याला विरोध दर्शवला आहे. ठाण्यापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे आदी गावांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी शेकडो एकर जमिनी १० वर्षापूर्वीच विकत घेऊन ठेवल्या आहेत. या बांधकाम व्यावसायिकांचा फायदा व्हावा यासाठी ठाणेकर मुलभूत सुविधांपासून वंचित असतानाही कोट्यावधी रूपये खर्च करून नवीन ठाण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला असून या प्रस्तावाला सभागृहात आणि रस्त्यावर विरोध करण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं अशी अवस्था सध्या महापालिका आणि सत्ताधा-यांची झाली असल्याचा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे. ठाणे शहरापासून जवळ असलेल्या या महसुली गावांचा विकास करण्यासाठी या भागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे महापालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांची संयुक्त नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव १९ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा विरोध दर्शवला. ठाणेकर मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ठाण्याला पाणी पुरवठा करणा-या धरणांमधील पाणी साठा कमी झाल्यानं आगामी काळात आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात करावी लागणार आहे. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. आता नव्यानं हिरानंदानींसह दोस्ती, लोढा यांच्या विकासासाठी नवीन ठाण्याचा प्रस्ताव आणण्यात आला असून १० वर्षापूर्वीच हा कट रचण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. कवडीमोल घेतलेल्या जमिनींवर नवीन ठाणे उभारायचं असेल तर सातबारावरील सर्व फेरफार रद्द करून या जमिनी ताब्यात घ्याव्यात. साडेबारा टक्क्यांचा हिशोब लावून त्या जमिनी शेतक-यांना परत द्याव्यात, त्यासाठी शासनानं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली असून या प्रस्तावाला राष्ट्रवादी विरोध करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

%d bloggers like this: