दिव्यामध्ये नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी उपोषणास बसलेल्या अमोल केंद्रे या युवकाची दखल पालिका प्रशासनानं न घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. दिव्याला नागरी सुविधा मिळाव्या यासाठी अमोल केंद्रे हा युवक गेले ७ दिवस उपोषण करत आहे. मात्र त्याची दखल कोणीच घेतली नाही. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमोल केंद्रेच्या उपोषणाला भेट देऊन त्याला आपला पाठिंबा दर्शवला त्यावेळी त्यांनी ही टीका केली. दिवा हा ठाणे महापालिकेचाच भाग आहे ना असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. रेल्वेच्या फाटकातला जीवघेणा प्रवास, वीजेच्या नावावर फक्त लाईट बीलं, हॉस्पिटलच्या नावाखाली विना डॉक्टरचे दवाखाने, आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली फक्त जाहिरातबाजीचे फलक आणि नागरी सुविधांच्या नावाखाली फक्त भुरळ पाडणारे स्वप्नांचे फलक. आम्ही करून दाखवलं काय ते मात्र दिसत नाही तरीही शिवसेनेला भरघोस मतदान करतो दिवेकर अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. खासदार बदला, आमदार बदला राष्ट्रवादी दिवा बदलेल, दिव्याचा चेहरा बदलेल, फरक बघायचा आहे तर खराखुरा कळवा बघा. येत्या निवडणुकीत हिंमत असेल तर अखंड दिवेकरांनी शिवसेनेवर बहिष्कार टाका, शिवसेनेला त्यांची जागा दाखवून द्या, राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे कारण विकास दाखवायचा नसतो तर घडवायचा असतो असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
