ठाण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपूलांचं लोकार्पण काल युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता या दोन उड्डाणपूलांमुळे ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे. मीनाताई ठाकरे उड्डाणपूल हा दोन मार्गिकांचा असून एक मार्गिका एलबीएसला तर दुसरी मार्गिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाते तर संत नामदेव चौकातील उड्डाणपूल कर्वे हॉस्पिटल ते महात्मा गांधी मार्गापर्यंत जाते. या पूलांसाठी राजन विचारे यांनी आमदार असल्यापासून पाठपुरावा केला होता. २०१४ मध्ये या पूलांना मंजुरी मिळाली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं या पूलांसाठी २२१ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. या पूलांना ध्वनीरोधक बसवण्यात आले असल्यामुळं ध्वनी प्रदूषणाचा त्रास रहिवाशांना होणार नाही.
