ठाण्यातील थीम पार्क हा सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून केलेला सामुहिक आर्थिक गुन्हा – संजय केळकर

ठाण्यातील थीम पार्क हा भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना असून सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून केलेला सामुहिक आर्थिक गुन्हा आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करून ठाणेकरांना न्याय देऊ असे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. घोडबंदर रस्त्यावरील जुने ठाणे, नवीन ठाणे या संकल्पनेवर आधारीत थीम पार्क मधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी काल भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह या थीम पार्कची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पार्कमधील मॉडेलची झालेली दुरावस्था पाहिल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. आनंद दिघ्यांनी ठाणे महापालिकेतील ४१ टक्के भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करून पालिकेतील सफाईची मोहिम हाती घेतली होती. मात्र आताच्या सत्ताधा-यांनी त्याहून दुप्पट भ्रष्टाचार करून थीम पार्क उभारलं आहे. त्रयस्थ ठेकेदाराकडून या थीम पार्कचा खर्च काढला असता हा खर्च अडीच कोटी पेक्षा जास्त होत नाही. पण पालिकेनं या थीम पार्कसाठी तब्बल १६ कोटी खर्च केले आहेत. त्यापैकी १३ कोटीचे बील ठेकेदाराला देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या ७ महिन्यात या पार्कची दैना उडाली आहे. हा सामुहिक भ्रष्टाचार असून याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करून मुदतीमध्ये ते निकालात काढण्याचा आग्रह धरू असं संजय केळकर यांनी सांगितलं. थीम पार्क उभारणा-या कंत्राटदारावर आरोप झाले असताना त्याच्याबरोबर अधिका-याने किंवा पालकमंत्र्यासारख्या नेत्याने फिरणे किंवा चर्चा करणे ही चीड आणणारी गोष्ट आहे. आम्ही एकीकडे ठाणे शहराचा ऐतिहासिक ठेवा जपत आहोत. तर दुसरीकडे या वारशांची विटंबना केली जात असल्याची खंत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीची पार्कमध्ये अवहेलना झाली आहे. अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक, जागतिक वारसा असलेली मुंबई-ठाणे पहिली आगगाडी यांच्या प्रतिकृती चुकीच्या पध्दतीनं सादर करण्यात आल्या असून त्यांची दैना उडाली असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading