ठाण्याचा खासदार कसा असावा याबाबत ठाण्यात लावलेल्या फलकानं उत्सुकता निर्माण करण्याबरोबरच त्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात आगामी महिन्यात निवडणुक होत असून राष्ट्रवादीनं आपला उमेदवार आधीच जाहीर करून प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र शिवसेनेच्या उमेदवारावर अद्याप तरी मोहर उमटलेली नाही. राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली असून शिवसेनेकडून राजन विचारे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. विचारे यांनीही आपली उमेदवारी गृहीत धरून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विचारे यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षातून झालेला विरोध पाहता विचारेंनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शहराध्यक्ष संदीप लेले, खासदार विनय सहस्रबुध्दे अशा मंडळींच्या भेटी घेतल्या आहेत. एकंदरीतच ठाणे लोकसभा मतदारसंघात हळूहळू निवडणुकीचं वातावरण रंगू लागलं असून ठाण्याचा खासदार कसा असावा या फलकावरून सध्या बरीच चर्चा रंगली आहे. बहुसंख्य लोकांनी ठाण्याचा खासदार हा सुशिक्षित असावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. सामाजिक संकेतस्थळावर यावरून सध्या वादविवाद रंगले आहेत. शिवसैनिक जोरदार विचारे यांची बाजू मांडत आहेत. तर इतर मंडळी मात्र सुशिक्षित उमेदवाराची अपेक्षा व्यक्त करून परांजपे यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा व्यक्त करत आहेत. ठाण्यामध्ये रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, प्रकाश परांजपे अशी सुशिक्षित खासदारांची परंपरा होती. त्यामुळं अशी परंपरा कायम रहावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
