घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची सभागृहात कोंडी केली. सामाजिक संस्थांच्या नावाखाली नाममात्र दरानं महापालिकेची मैदानं, उद्यानं मिळवून त्याचा व्यावसायिक लाभ उठवत बक्कळ कमाई करणा-या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा भांडाफोड भारतीय जनता पक्षानं केला आहे. घंटाळी मैदान आणि रंगमंच या महापालिकेच्या जागेचं व्यवस्थापन  शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास सामंत यांच्या घंटाळी प्रबोधिनीकडून केलं जातं. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनीही यावर खुलासा करण्याची मागणी करून सेनेची कोंडी केली. नौपाडा येथील घंटाळी मैदान आणि रंगमंच १९९९ मध्ये कोणतीही निविदा न मागवता नाममात्र भाड्यानं निगा आणि देखभाल संस्थेच्या खर्चानं करण्याच्या अटीसह सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार घंटाळी मैदान आणि रंगमंच २००१ मध्ये ११ वर्षांसाठी घंटाळी प्रबोधिनी या संस्थेला देण्यात आला. त्यानंतर पुन्हा २०१० मध्ये याच संस्थेला हे मैदान भाड्यानं देण्यात आलं. घंटाळी प्रबोधिनीचे अध्यक्ष हे शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास सामंत आहेत. त्यांनी पालिकेचं हे मैदान खाद्यपदार्थ जत्रा, व्यापारी पेठेला अनेकवेळा दिलं. त्याप्रमाणे वर्षाला ५ लाखाप्रमाणे आत्तापर्यंत ५० लाख लाटल्याचा आरोप सुनेश जोशी यांनी केला आहे. तसंच एखादा नगरसेवकच पालिकेचा लाभार्थी होण्याला त्यांनी आक्षेप घेतला असून पालिकेनं नगरसेवकाच्या संस्थेशी करार कसा केला याबाबत जाब विचारला. मंजूर विकास आराखड्यानुसार या मैदानावर कोणतंही बांधकाम करता येत नसताना अभ्यासिकेच्या नावानं एक मजला बांधण्यात आला आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं जातं. या अभ्यासिकेच्या व्यवहारांचा आणि पालिकेला मिळणा-या भाड्याचा उल्लेखही ताळेबंदात नसल्याचं सुनेश जोशी यांनी सर्वसाधारण सभेच्या निदर्शनास आणून हा करार रद्द करण्याची मागणी केली. यावर उपनगर अभियंता राजन खांडपेकर यांनी थातुरमातुर विश्लेषण करून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महापौरांनी मैदानाचा वापर थांबवण्यास सांगून आगामी सर्वसाधारण सभेत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

 

Leave a Comment

%d bloggers like this: