गडकरी रंगायतनची वास्तू न पाडता त्याचं नुतनीकरण करण्याची अनंत तरेंची मागणी

ठाण्याचं वैभव असलेल्या गडकरी रंगायतनची वास्तू न पाडता त्याचं नूतनीकरण करावं आणि एखाद्या नविन भूखंडावर नवीन नाट्यगृह बांधावं अशी मागणी शिवसेनेचे माजी महापौर अनंत तरे यांनी एका निवेदनाद्वारे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं वचन आणि त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करून देणा-या गडकरी रंगायतननं कित्येक नवोदित कलाकरांना घडवलं आहे. मात्र काही माथेफिरू गडकरी रंगायतन सारखी दुर्मिळ आणि ठाणेकरांची शान असलेली वास्तू पाडण्याचा डाव रचत आहेत. गडकरी रंगायतनच्या वास्तूस हात न लावता त्याचं नूतनीकरण करावं अशी मागणी अनंत तरे यांनी केली आहे. १९६७ मध्ये ठाणे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाण्यात आलेल्या शिवसेना प्रमुखांना प्रकाश गुप्ते या शिवसैनिकानं चिठ्ठी पाठवून शहरात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली होती. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी ठाणेकरांनी महापालिकेवर भगवा फडकवावा आणि लगेच नाट्यगृह देऊ असं वचन दिलं होतं. त्यानुसार शिवसेनेची सत्ता आल्यावर गडकरी रंगायतनची वास्तू उभी राहिली. १९९९ मध्ये या नाट्यगृहाचं नुतनीकरण झाल्यानंतर पुन्हा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते या नाट्यगृहाचा शुभारंभ करण्यात आला होता. अशी वास्तू पाडून पुन्हा नवीन नाट्यगृह उभारण्याचा प्रयत्न कोणी माथेफिरू करत असेल तर त्याला ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांचा पूर्ण विरोध असेल असं तरे यांचं म्हणणं आहे. महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना गडकरी रंगायतन तोडण्यापासून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना थांबवून रंगायतन नाट्यगृह तोडण्याऐवजी त्याचं नुतनीकरण करून तिसरे नाट्यगृह बांधून देण्याचे आदेश आपण द्यावेत अशी मागणी अनंत तरे यांनी केली आहे. गडकरी रंगायतनच्या पार्कींगसाठी बाजूची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेऊन तिथे वाहनतळ उभारता येऊ शकतो. ज्यांना नवीन नाट्यगृह हवं आहे त्यांना नवीन भूखंडावर नाट्यगृह उपलब्ध करून देता येईल. त्याकरिता गडकरी रंगायतन पाडण्याचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न अनंत तरे यांनी उपस्थित केला आहे. याउपरही कोणी माथेफिरू नाट्यगृह तोडून टाकण्याचा प्रयत्न करत असेल आणि तोही शिवसेनेचा पदाधिकारी असेल तर त्याच्या विरोधात बंड झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही अनंत तरे यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: