खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसैनिकांची मुख्य वन संरक्षकांच्या कार्यालयावर धडक – जळलेल्या झाडांची राख वन संरक्षकांवर टाकली – श्रीकांत शिंदेंसह शिवसैनिकांना अटक

लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लावलेली झाडं जाळल्या प्रकरणी आक्रमक झालेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी ठाण्यातील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाला धडक दिली आणि जळालेली झाडं तसंच राख मुख्य वन संरक्षक राजेंद्र कदम यांच्या अंगावर टाकली. याप्रकरणी दोषी अधिका-यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. ५ जुलै २०१७ ला अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ या गावी वन विभागाच्या ८० एकर जागेवर लोकसहभागातून एकाच दिवसात १ लाख झाडं लावण्यात आली होती. या झाडांची संरक्षणाची जबाबदारी वन विभागानं घ्यावी, वेळोवेळी येथील गवत कापावे, संरक्षक भिंत बांधावी, कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक ठेवावेत अशा विविध मागण्या श्रीकांत शिंदे यांनी केल्या होत्या. त्यावेळी उप वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी ही सर्व कामं करण्याची ग्वाही दिली होती. मात्र प्रत्यक्षात यापैकी काहीच झालेलं नाही. वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या आठवड्यात समाजकंटकांनी यापैकी काही झाडांना आग लावली. गेल्या वर्षीसुध्दा असाच प्रकार घडला होता. त्यावेळीही वन विभागानं काहीच कारवाई केली नव्हती. त्यामुळं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वन संरक्षक कार्यालयाला धडक दिली आणि मुख्य वन संरक्षकांना जळलेली झाडं दाखवत त्यांच्या अंगावर राख तसंच शाई फेकण्यात आली. वन विभागाला झाडांचं संगोपन शिवसेना करत असल्याची किंमत नसून स्थानिक भूमाफीया आणि वीट भट्टीवाल्यांशी वन अधिका-यांची हातमिळवणी असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. सरकार झाडं लावण्यासाठीच्या कार्यक्रमावर आणि त्याच्या प्रसिध्दीवर जितका खर्च करते तो खर्च झाडं जगवण्यावर केला असता तर महाराष्ट्र हिरवागार झाला असता अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. खासदार आणि शिवसैनिकांचा रौद्र अवतार पाहून मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी बदलापूरचे वन अधिकारी चंद्रकांत शेळके यांना तातडीनं निलंबित केले तर उप मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर आणि इतर वन कर्मचा-यांची आठवडाभरात चौकशी करून त्याचा अहवाल शासनाला पाठवण्याचे लेखी पत्रच खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलं. आंदोलनानंतर पोलीसांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading