खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं मांगरूळ येथे लावण्यात आलेल्या झाडांना आगी लावण्याचा प्रकार

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं लोकसहभागातून मांगरूळ येथे लावण्यात आलेल्या एक लाख झाडांना सलग दुस-या वर्षी आग लावण्याचा प्रकार घडला आहे. या आगीत जवळपास ७० टक्के झाडं जळून खाक झाली आहेत. मांगरूळ या गावी वन विभागाच्या सुमारे ८० एकर जमिनीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून १ लाख झाडं लावण्याचं महाअभियान राबवलं होतं. १५ हजार लोकांनी यात सहभाग घेऊन अवघ्या काही तासात १ लाख झाडं लावली होती. या झाडांचं संगोपन करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चानं पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनची व्यवस्था केली होती. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे या झाडांच्या भवितव्यावरच प्रश्न निर्माण झाला असून हजारो हातांची मेहनत वाया गेली आहे. या झाडांचं जतन व्हावं आणि आगी लावण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी गवताची नियमित कापणी करावी, समाजकंटकांकडून घातपाताचे प्रकार होऊ नये याकरिता संरक्षक भिंत बांधावी, टेकडीवर चौकी उभारून कायमस्वरूपी वनरक्षकाची नियुक्ती करावी अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी वन विभागाला केल्या होत्या. मात्र वन विभागानं त्याकडे साफ दुर्लक्ष केल्यानं वारंवार आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्यावर्षीही वृक्षारोपणानंतर काही महिन्यातच मांगरूळ येथील झाडांना आग लावण्यात आली होती. त्यामुळं वन विभागानं गांभीर्यानं या झाडांचं जतन करावं अशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मागणी केली होती. पण वन विभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी उप मुख्य वनसंरक्षक जबाबदार असून त्यांना निलंबित करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: