येत्या सोमवारपासून राम मराठे संगीत महोत्सव

कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा शास्त्रीय संगीताचा समृध्द वारसा जोपासणारा प्रतिष्ठेच्या अशा पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन येत्या सोमवारपासून करण्यात आलं आहे.महापालिका, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या सहकार्यानं या संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रख्यात ज्येष्ठ ध्रूपद गायक पंडीत उदयकुमार मलिक यांच्या गायनानं या महोत्सवाची सुरूवात होणार आहे. १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत गडकरी रंगायतन येथे हा संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे. या संगीत महोत्सवाचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या महोत्सवाचं उद्गाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गायिका धनश्री पंडीत –राय यांच्या ठुमरी, कजरी यांच्या सादरीकरणानं पहिल्या दिवसाची सुरूवात होणार आहे. मंगळवारी २० नोव्हेंबर रोजी वृषाली दाबके यांचं कथ्थक नृत्य असून ज्योती खरे-यादवार यांच्या शास्त्रीय गायनानं समारोप होणार आहे. बुधवार २१ नोव्हेंबर रोजी डॉ. अश्विन दळवी सूरबहार वादनाची मैफील सादर करणार आहेत. तर श्रीनिवास जोशी यांच्या शास्त्रीय गायनानं या सत्राचा समारोप होणार आहे. गुरूवार २२ नोव्हेंबर रोजी रूपक पवार, निषाद पवार यांचं तबला वादन तर सूफी गायक डॉ. भारती बंधू सूफी यांचं गायन होणार आहे. शुक्रवारी २३ नोव्हेंबर रोजी अंतर्नाद निर्मित श्यामरंग हा संगीत नाट्यमय विशेष कार्यक्रम होणार आहे, तर रूपक कुलकर्णी यांचं बासरी वादन, पंडीत कैलाश पात्रा यांचं व्हायोलीन वादन आणि उस्ताद फारूक लतीफ खान यांच्या सारंगी वादनानं या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी या संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading