कळव्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या वाघोबानगर आणि भास्करनगरच्या विकासासाठी १२ कोटींचा विशेष निधी दिला जाणार आहे. पालिका आयुक्तांनी ही घोषणा केली. पारकिसक बोगद्यावरील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त या ठिकाणी आले होते. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भागात पाणी पुरवठ्यासह नागरी समस्यांची भरमार असल्याचं पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालिका आयुक्तांनी हा विशेष निधी जाहीर केला. गेल्या ३५ वर्षापासून येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही वणवण थांबवण्याची विनंती आमदार आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर आयुक्तांनी तात्काळ या भागात जलकुंभ उभारून पाण्याची समस्या निकाली काढण्याची घोषणा केली. या भागातील पाणी समस्या, शौचालय, रस्ते आदी नागरी कामांसाठी १२ कोटींचा विशेष निधी दिला जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं असून या संदर्भातील प्रस्ताव पुढील महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवला जाईल असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं.
