कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या लवकरच कामाला सुरूवात

कल्याण आणि ठाणेवासिय ज्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत त्या कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या कामाला सुरूवात होत असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रूपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरूवात होत आहे. ठाणे महापालिकेनं केलेल्या डीपीआरला केंद्र शासनानं मंजुरी दिली असून महापालिकेच्या सल्ल्यानं जेएनपीटी या जेटीचं बांधकाम करणार आहे. ठाणे-कल्याण-वसई या जलमार्गासाठी ६४५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार असून त्यापैकी १०० कोटी रूपयांचा पहिला हफ्ता जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येणार आहे. ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्यामुळेच केंद्र शासनानं कल्याण, ठाणे, मुंबई या जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला होता. कल्याण-ठाणे-वसई आणि कल्याण-ठाणे-मुंबई अशा दोन टप्प्यात हा प्रकल्प होणार आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरारोड येथे जेट्टीच्या कामाला सुरूवात होत आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना रेल्वे व्यतिरिक्त वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. लवकरात लवकर या प्रकल्पाचं काम पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेत तो दाखल व्हावा यासाठी शिवसेना पाठपुरावा करत राहणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: