जवळपासच्या दोन महिन्याच्या सुट्टीनंतर काल शाळा सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस काल विविध ठिकाणी अनोख्या पध्दतीनं साजरा झाला. खाजगी शाळांमध्ये प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेत मुलांचं खाऊ, फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या मुलांना ओवाळून त्यांचं स्वागत करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये पाना-फुलांचं बांधलेलं तोरण, गोडधोड जेवणाची पंगत, ढोल-ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांची काढलेली मिरवणूक, नक्षीदार रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांनी केलेली शाळेची सजावट असं आल्हाददायक वातावरण बघायला मिळालं. प्रि-नर्सरी शाळाही याबरोबर सुरू झाल्या. अगदीच दीड ते दोन वर्षाची कधीही आई-बाबांपासून दूर न झालेली मुलं शाळेत जाताना अनोखं चित्र पहायला मिळत होतं. धाय मोकलून रडणारी मुलं, आनंदात बागडणारी मुलं, त्यांच्याबरोबर भावनाविवश झालेले पालक असं चित्र या शाळांमध्ये पहायला मिळत होतं.