कल्याण पश्चिमेत वाहतूक पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवत वाहन चालकांना वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. टू-व्हिलर चालवताना हेल्मेटचा वापर करा’, ‘फोर व्हिलर चालवताना सीटबेल्ट वापरा अशा सूचना पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र, वाहतूक पोलिसांचे नियम धाब्यावर ठेवून आपला जीव धोक्यात टाकत वाहन चालक वाहन चालवत असल्याने या वाहन चालकांना सूचना देण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांनी चक्क यमराजाच्या वेशात वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक नियमांसंदर्भात जनजागृती केली जात आहे. विना हेल्मेट बाईक चालवणे, सीट बेल्ट न लावता कार चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट गाडी चालवणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे यासारखे अनेक प्रकार सर्रासपणे होत असल्याचे आपल्याला दररोज दिसून येतात. आणि वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यानेच दररोज अनेक छोटे मोठे अपघातही होत असतात. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरलेल्या या प्रतिकात्मक यमराजांनी वाहन चालकांना ‘वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा मी तुम्हाला घेऊन जाईन’ अशा शब्दांत आवाहन केले आहे.