ठाणे पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या कोपरी रेल्वे पुलाचे डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे नवीन कोपरी पुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत पुलावरून लहान वाहनांबरोबर अवजड वाहने जात असतात. मात्र पुलावरील चेंबरचे झाकण तुटल्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिमेकडून ठाणे पूर्व भागात नवीन पुलावर येतेवेळी दोन चेंबर आहेत. यापैकी सिमेंट क्राँक्रीटचे चेंबर खराब झाले आहे. चेंबरच्या झाकणावरील लोखंडी सळ्या दिसत असून तुटलेल्या चेंबरच्या भागातून खोलवर दिसून येते. त्यामुळे चेंबरची तात्काळ दुरुस्ती केली नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.